फक्त सॉफ्टवेअर्स शिकणं म्हणजे ग्राफिक डिझाईन शिकणं मुळीच नसतं. म्हणून ग्राफिक डिझाईनला कुठेही प्रवेश घेण्यापूर्वी ग्राफिक डिझाईनची ही व्याख्या समजून घ्या.

“संबंधित विषयानुरूप विशिष्ट मेसेज देण्यासाठी उपलब्ध रॉ मटेरियलच्या आधारे पूरक विचार प्रक्रिया आणि सूक्ष्म निरीक्षणातून सुचलेल्या कल्पनेवर आधारित विशिष्ट टूल्स वापरून दृक-श्राव्य घटकांची परिणामकारक, सर्जनशील आणि आकर्षक रचना करून निर्माण केलेल्या कलाकृतीला ग्राफिक डिझाईन म्हणतात.” 

Graphic design is an effective, creative and Attractive composition of audio-visual elements, created using specific tools with the idea that comes through a Complementary thought process and subtle observation, based on the raw material available to convey a specific message about the relevant subject.

ग्राफिक डिझाईनच्या ह्या व्याख्येचं स्पष्टीकरण करून आपण ग्राफिक डिझाईन म्हणजे काय ते अगोदर समजून घेऊ. म्हणजे ग्राफिक डिझाईन म्हणजे नक्की काय असतं याची तुम्हाला कल्पना येईल. ग्राफिक डिझाईनच्या ह्या व्याख्येतील मुख्य मुद्दे आपण समजून घेऊ. 

१. संबंधित विषय म्हणजे काय? 

संबंधित विषय म्हणजे ज्या विषयासंबधित ग्राफिक डिझाईन बनवायचे आहे तो विषय. हा विषय वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक, आर्थिक, पारमार्थिक, वैज्ञानिक, किंवा इतर कोणताही असू शकतो. खरं तर ग्राफिक डिझाईनचे विषय हे सिमीत नसतात. 

ग्राफिक डिझाईनचा संबंध व्यावसायिकतेशी थोडा अधिक येतो. कारण व्यावसायिकाला त्याच्या व्यवसाय वृद्धीसाठी ग्राफिक डिझाईनची खूप गरज असते. यामध्ये विशेषतः उद्योग / व्यवसाय, प्रॉडक्ट, आणि सेवा यांच्या ऍडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंगसाठी डिझाईन्स बनवायची असतात. समजा गरम मसाला हा प्रॉडक्ट असेल आणि त्याच्या पॅकिंगचा बॉक्स किंवा पाऊच बनवायचा आहे. तर गरम मसाला हा विषय झाला. आणि हा विषय लक्षात घेऊन त्यानुसार त्याच्या बॉक्स किंवा पाऊचसाठी ग्राफिक डिझाईन बनवायचं असतं. सारांश संबंधित विषयानुरूप म्हणजे प्रत्यक्ष डिझाईनला सुरुवात करण्याआधी संबंधित विषयाचा अभ्यास करायचा असतो. विषयानुरूप बॉक्स डिझाईन बनविणे हे एक ग्राफिक डिझाईन झाले. पण एकाच विषयानुरूप म्हणजे इथे गरम मसाल्यासाठी अर्थात एकाच प्रॉडक्टच्या जाहिरात, मार्केटिंग आणि प्रमोशन साठी अनेक प्रकारची डिझाईन्स बनवायची असतात. नव्हे तर एकाच प्रॉडक्ट साठी विविध प्रकारच्या डिझाईन्सची एक मालिकाच असते. 

ज्या विषयाचे ग्राफिक डिझाईन बनवायचे आहे तो विषय अगोदर पूर्णपणे समजून घ्यावा लागतो. तो विषय एखादा विचार असू शकतो, एखादा प्रॉडक्ट असू शकतो, एखादी योजना असू शकते, एखादी सेवा असू शकतो किंवा काहीही. दैनंदिन व्यवहाराशी संबंधित कोणताही विषय ग्राफिक डिझाईनचा विषय असू शकतो.

तुम्हाला तुमचे मत व्यक्त करायचे आहे, किंवा तुम्हाला तुमच्याबद्दल सांगायचे आहे. म्हणजे तुमचा हा वैयक्तिक विषय तुम्ही ग्राफिक डिझाईनच्या माध्यमातून सांगू शकता. समजा तुम्हाला तुमच्याविषयी किंवा तुमच्या एखाद्या अनुभवावर आधारित पुस्तक लिहावेसे वाटले. तर ते पुस्तक म्हणजे एक ग्राफिक डिझाईन असते. मग त्या पुस्तकाच्या कव्हर पासून त्या पुस्तकाच्या अंतर्गत सजावटीच्या अनेक गोष्टी ग्राफिक डिझाईनमध्ये येतात. 

२. विशिष्ट संदेश देणे. 

ग्राफिक डिझाईनचा विषय निश्चित करून तो पूर्णपणे समजून घेतल्यावर त्या विषयाची नेमकी कोणती माहिती सांगायची आहे, संबंधित विषयाबद्दल डायरेक्ट, इन डायरेक्ट कोणता संदेश दिला गेला पाहिजे ते निश्चित करावे लागते. संबंधित विषयातील स्पर्धकांच्या  (competitor) ग्राफिक डिझाईनमधील संदेशांचा अभ्यास करून त्यांच्यापेक्षा वेगळा संदेश कसा देता येईल ह्याचा विचार करावा लागतो. निवडलेल्या विषयाची एक वेगळी आयडेंटिटी निर्माण होण्यासाठी हे महत्वाचं आहे. त्यासाठी निवडलेल्या विषयातील स्पर्धकांचा अभ्यास करणे हेही तितकेच महत्वाचे आहे. 

ग्राफिक डिझाईन हे एक मानसशास्त्र आहे, एक तर्कशास्त्र सुद्धा आहे. एखाद्या प्रॉडक्ट विषयी विशिष्ट संदेश देण्यासाठी ग्राफिक डिझाईनमध्ये काय असलं पाहिजे हे मानस शास्त्र आणि तर्क शास्त्राच्या आधारे निश्चित करता येते. ग्राहकाच्या मनात प्रॉडक्ट विषयी विश्वास निर्माण करण्याचे काम हा संदेश करत असतो. संदेश पटला तर ग्राहक तो प्रॉडक्ट किंवा सेवा विकत घेण्याचा विचार करतो. किंबहुना असे म्हणता येईल कि  हा संदेश ग्राहकाला तो प्रॉडक्ट विकत घेण्यासाठी प्रवृत्त करतो.  संदेश ही मनावर परिणाम करणारी एक अदृश्य शक्ती आहे. त्यामुळे ग्राफिक डिझाईनमधून कळत नकळत जाणारा संदेश  खूप महत्वाचा असतो. कोणतंही ग्राफिक डिझाईन पाहिल्यानंतर एखाद्याला मनापासून जे वाटतं तो त्या संदेशाचा परिणाम असतो. आणि त्या परिणामानुसार त्याची कृती घडत असते. अपेक्षित कृती घडणं हे त्या डिझाईनचं यश असत. 

३. उपलब्ध रॉ मटेरियल. 

कोणत्याही निर्मितीसाठी रॉ मटेरिअलची गरज असतेच. तशीच ग्राफिक डिझाईनसाठीही रॉ मटेरिअलची गरज असते. आता हे रॉ मटेरियल कोणते? प्रत्येक व्यक्तीकडे कमी अधिक प्रमाणात हे रॉ मटेरियल असते. ह्या रॉ मटेरिअलवरच डिझाईनचा दर्जा ठरतो. रॉ मटेरियल दोन प्रकारचं असतं. एक दृश्य रॉ मटेरियल आणि दुसरं अदृश्य रॉ मटेरियल. दृश्य रॉ मटेरिअलमध्ये कागद, पेन्सिल, कॅमेरा, कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर, वेगवेगळे आकार, कलर, फोटो इमेज, आदी मटेरियल येतं. आणि अदृश्य मटेरिअलमध्ये जन्मा पासून आतापर्यंत मिळालेला चांगला वाईट अनुभव, आज अखेर केलेला विविध विषयांचा अभ्यास, पाहिलेल्या गोष्टी, विशिष्ट विषयाचं ज्ञान, चिंतन, मनन करण्याची वृत्ती, तुमचे विचार, तुमची मतं. तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, आदी अनेक गोष्टी येतात. आपल्या अवती भोवती घडत असलेल्या घटनांविषयी आपण किती जागरूक असतो हाही ग्राफिक डिझाईनसाठी लागणाऱ्या रॉ मटेरिअलचाच भाग आहे. इनपुट आणि आऊटपुट ह्या संज्ञा सर्वाना माहित आहेत. त्यानुसार ग्राफिक डिझाईनसाठी लागणारी मानवी इनपुट साधने म्हणजे डोळ्याने पाहणे, वाचणे, कानाने ऐकणे, जिभेने चव घेणे, नाकाने मिळणारा गंध. स्पर्श, इत्यादी, इत्यादी.  तात्पर्य मानवी इनपुट इंद्रियांच्या साहाय्याने तुम्ही मिळविलेले ज्ञान हे ग्राफिक डिझाईनचे रॉ मटेरियल असते. ह्या सर्व रॉ मटेरिअलच्या विशिष्ट प्रकारे केलेल्या मिश्रणातून ग्राफिक डिझाईन बनते. 

४. पूरक विचार प्रक्रिया. 

दृश्य किंवा अदृश्य रॉ मटेरियलचा उपयोग तुम्ही तुमच्या गरजेनुसार अनेक कारणांसाठी करू शकता. किंबहुना ही प्रोसेस तुमच्या जीवनात कळत नकळत सुरूच असते. पण आपण त्याकडे कधी फार गांभीर्याने पाहत नाही. जेंव्हा तुम्हाला काहीतरी करायचं आहे. तेंव्हा ते करण्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं ते तुम्ही विकत / फुकट कसेही घेऊन येता. म्हणजे मला जे काय करायचं आहे हे अगोदर ठरतं. आणि ते ठरण्यासाठी तुमच्या जवळ असलेल्या किंवा तुम्हाला माहित असलेल्या रॉ मटेरिअलच्या आधारे तुम्ही विचार करत असता. कळत नकळत सहज विचार करणं, डोक्यात विचार येणं ही नेहमीच सुरु असलेली एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण जेंव्हा आपण जाणीवपूर्वक एखाद्या विषयासंबंधित विचार करतो तेंव्हा त्यातून खूप चांगलं किंवा खूप वाईट, उपयोगी, निरुपयोगी काही तरी निर्माण होत असतं. ह्या  पूरक विचार प्रक्रियेतूनच ग्राफिक डिझाईन कसं असायला पाहिजे, ते ठरतं. म्हणूनच ह्या मानवी जीवनातील योग्य त्या विचार प्रक्रियेला समजून घेणं हा ग्राफिक डिझाईनच्या अभ्यासातील एक महत्वाचा विषय आहे. ही विषयानुरूप विचार प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची असते. आणि  ती मन, भाव, भावना, विचार, बुद्धी, क्रिया, प्रतिक्रिया या सर्वांशी निगडित असते. सूक्ष्म विचार प्रक्रियेतूनच हळू हळू तुमचा स्वभाव बनतो. स्वार्थी / निस्वार्थी वृत्ती बनते, माझं आणि तुझं हे वेगळेपण जन्म घेत. राग, द्वेष निर्माण होतो, सत्य / असत्य, श्रद्धा / अंधश्रद्धा ह्या साऱ्या बाबतीत तुम्ही जेवढे परिपक्व असता तेवढं तुमचं डिझाईनही परिपक्व बनतं.  कारण ही परिपक्वता क्रिएटिव्ह ग्राफिक डिझाईनचं रॉ मटेरियल आहे. आणि ही परीपक्वता निर्माण होण्यासाठी कधीही न संपणारी ही पूरक विचार प्रक्रिया महत्वाची आहे. 

५. सूक्ष्म निरीक्षण : विचार प्रक्रिया सुरु असतानाच तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहात असता. तुमच्या कानावर काहीतरी पडत असतं. तुम्ही जे पाहता किंवा ऐकता त्याचा कमी अधिक प्रमाणात तुमच्यावर परिणाम होत असतो. लक्ष कशावर केंद्रित करायचं हे तुमच्या गरजेवर अवलंबून असतं. एखाद्या गोष्टीकडे पाहत असताना तुम्ही जे काय पाहता त्यामध्ये त्याच वेळी मनातील भावना आणि डोक्यातील विचार मिक्स होऊन मेंदूत जे रेकॉर्डिंग होतं ते ग्राफिक डिझाईनसाठी लागणारं रॉ मटेरियल असतं. सूक्ष्म निरीक्षण ही फार अवघड गोष्ट नाही पण त्याची सवय लागायला हवी. वरवर पाहायचं आणि सोडून द्यायचं ही वृत्ती बदलायला हवी. सूक्ष्म निरीक्षणातूनच तर्क केला जातो. ज्याचा उपयोग ग्राफिक डिझाईनमध्ये होतो. म्हणून पाहायला शिकणं हा ग्राफिक डिझाईनचाच एक भाग आहे. समोरचं दृश्य किंवा एखाद्या वास्तूचं हुबेहूब चित्र काढायचं ही एक कलात्मक दृष्टी आणि कौशल्य असते. म्हणजे सारं काही नाही. समोर जे जे दिसतं त्याचं निरीक्षण करून परीक्षण करायचं. त्यातूनच बोध घ्यायचा. छोटा मोठा एखादा शोध लावायचा. काहीतरी सिद्ध करायचं. एखादा नवीन अनुभव घ्यायचा. हे सारं निरीक्षणातूनच होतं. शेवटी ह्या साऱ्यांचा उपयोग कसा करायचा हा ग्राफिक डिझाईन अभ्यासक्रमातील एक अदृश्य अभ्यास विषय आहे. पण तो जाणीवपूर्वक शिकवा लागतो. 

६. कल्पना सुचणे. 

कल्पना सुचणं ही एक साधी पण अद्भुत गोष्ट आहे. कल्पना कधीकधी अगदी सहजच एका क्षणात सुचते, तर कधी त्यासाठी खूप विचार करावा लागतो. कल्पना सुचण्यासाठी काळ, वेळ नसते. रात्री अपरात्री केंव्हाही अगदी स्वप्नातसुद्धा कल्पना सुचत असते. कमी अधिक प्रमाणात कल्पना सर्वांनाच सुचतात. पूरक विचार आणि सूक्ष्म निरीक्षण करून जे काही करायचं असतं ते साध्य करण्यासाठी कल्पना सुचली पाहिजे.  म्हणजे कल्पना सुचण्यासाठी एखादं वैयक्तिक किंवा व्यावहारिक साध्य निश्चित करावं लागतं. विशेषतः जाहिरातीचे ग्राफिक डिझाईन करण्यासाठी कल्पना खूप महत्वाची असते. कल्पना सुचते कशी? हा ग्राफिक डिझाईनचा एक बेसिक सब्जेक्ट आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास, वर उल्लेख केलेल्या दृश्य / अदृश्य रॉ मटेरियलच्या आधारे पूरक विचार प्रक्रिया आणि सूक्ष्म निरीक्षणातून ही कल्पना सुचते. एखादे साध्य पूर्ण करण्यासाठी सुचलेल्या कल्पनेला दृश्य रूपात आणणं म्हणजे ग्राफिक डिझाईन. कल्पनेतूनच सर्जनशीलतेचा जन्म होतो. कोणतीही कल्पना दृश्य रूपात दाखवताना विशिष्ट संदेश देण्यासाठी वापरलेली इतरांपेक्षा वेगळी पद्धत म्हणजेच सर्जनशीलता. कल्पनेचं स्वरूप विषयानुरूप वेगवेगळं असू शकतं. म्हणूनच ग्राफिक डिझाईनर बनण्यासाठी विविध विषयांचा अभ्यास करावा लागतो. नवीन नवीन गोष्टी शिकाव्या लागतात.  

ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी एक मानसिकता असावी असावी लागते, कलेची आवड आणि काहीतरी नवीन करण्याची वृत्ती असावी लागते. मी ग्राफिक डिझाइन शिकणारच असा ठाम निश्चय असणं ही आमच्याकडे प्रवेश घेण्यासाठी मुख्य पात्रता आहे. जॉब गॅरंटीचं संकुचित उद्दिष्ट आम्हाला पटत नाही. आम्ही नॉलेज गॅरंटी मात्र नक्कीच देतो. जे मनासारखं करिअर घडवायला उपयोगी पडते. 

असो, ग्राफिक डिझाईनच्या व्याख्येतील इतर काही मुद्दे आणि ग्राफिक डिझाईनमधील करिअर विषयक इतर गोष्टी आपण पुढील लेखात पाहू. 

ग्राफिक डिझाईन कोर्सविषयी तुमच्या काही शंका असतील तर डायरेक्ट कॉल करू शकता. ९३७११०२६७८.

ऑल इन वन ग्राफिक डिझाईन कोर्सची प्रवेश प्रक्रिया.

१. ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरा. 

 

२. ऑनलाईन एन्ट्रन्स एक्झाम द्या. 

३. एन्ट्रन्स पास विद्यार्थ्यांना फायनल प्रवेश. 

४. प्रवेश मर्यादा फक्त ३० 

५. बॅच ११ जुलै पासून सुरु.

 

इलेमेंटरी / इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड पास, आर्ट टिचर डिप्लोमा, (A.T.D.), G.D Art, / Fine Art / Applied Art पूर्ण किंवा शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना थेट प्रवेश दिले जातील. त्यांना एन्ट्रन्स एक्झाम देण्याची गरज नाही. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *